महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापूर (करवीर ) इथे आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथे , ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकुट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठात गणना होते.मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ. स १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.महलक्ष्मि ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुड मंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
इतिहास
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकुट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमत संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्या यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथियांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ .स. १७२२ मध्ये दुसऱ्या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदुराव घोरपडे ला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाड पंथी वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगर खाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महलक्ष्मि ची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरुड मंडप असे म्हणतात. अश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.
सूर्यकिरणे
कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते.या दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ते महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात आणि तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा चमत्कार जवळ जवळ पाच मिनटांपर्यंत चालतो. या दिवशी देवीला खास प्रार्थना केली जाते. हा चत्मकार पहाण्यासाठी भाविक मोठया संख्येने जमा होतात. हा मुहूर्त पुजारी पंचांग पाहून ठरवितात. देवळाची बांधणीच अशातऱ्हेने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.
शुक्रवार , मंगळवार हे देवीचेदिवस मानले जातात. दर शुक्रवारी व अश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार - चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती , घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश , फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मि व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळद कुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर उद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे.
No comments:
Post a Comment