श्री वज्रेश्वरी देवी
वसई शहराच्या दक्षिणेकडे समुद्रकिनाऱ्यालगत वसईचा प्रसिद्ध किल्ला आहे.सन 1738 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या अमलाखाली होता. पोर्तुगीज प्रजेचा छळ करीत असत. ही हकिकत पेशव्यांच्या कानी पडली आणि पेशव्यांनी श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे यांची वसई किल्ल्याच्या मोहिमेवर नेमणूक केली. चिमाजी आप्पा पेशवे आपला फौजफाटा घेऊन वसईच्या कामगिरीवर निघाले. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे पेशव्यांच्या सैन्याचा तळ पडला.लहान-मोठे तंबू, राहुट्या अकलोलीपासून गणेशपुरीपर्यंत पसरल्या.अमावास्येची रात्र होती. सर्व सैन्य झोपी गेले होते. परंतु चिमाजी आप्पांना झोप येईना. मध्यरात्र उलटून गेली. पहाटेचा पहिला प्रहर झाला. तरीही झोपेचे नाव नव्हते. बेचैनी वाढू लागली. अखेर पहाऱ्याच्या बंदोबस्तावर नजर फिरवावी म्हणून ते बाहेर पडले. तेथे त्यांना कुंडाजवळ एक आकृती दिसली.ते त्या आकृतीचा पाठलाग करीत निघाले. ते थेट कुंजकटाईजवळच्या जंगलातील वज्रेश्वरी देवळाजवळ त्या आकृतीच्या पाठोपाठ आले. ती आकृती अचानक अदृश्य झाली. चिमाजी आप्पा देवळात गेले. त्यांनी देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले व वसई मोहिमेच्या विजयाचा देवीजवळ कौल मागितला. चिमाजी आप्पांनी देवीला नवस केला की युद्धात विजय झाला तर ज्या ठिकाणी तू मला दृष्टांत दिलास तेथे मी वसईच्या किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधीन. वज्रेश्वरी देवीची चिमाजी आप्पांवर कृपा झाली.
वसई मोहीम फत्ते झाली आणि सन 1738 मध्ये पोर्तुगीजांची राजवट संपली.वसईच्या किल्ल्यावर पेशव्यांचा भगवा ध्वज दिमाखाने फडकू लागला. देवीला नवस बोलल्याप्रमाणे वज्रेश्वरी येथे चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीचे भव्य मंदिर बांधून नवसाची पूर्तता केली. त्याआधी वसईच्या किल्ल्यात असलेल्या वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. हेच ते पेशवेकालीन वज्रेश्वरी देवीचे वसई किल्ल्यातील मंदिर होय.या घटनेला दोनशे वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर कालौघात मंदिर जीर्णशीर्ण झाले. सन 1957 मध्ये किल्ल्यातील वज्रेश्वरी मंदिराच्या लगत असलेल्या नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तद्नंतर वासुशेठ पै,लालजी मिस्त्री, भाऊसाहेब मोहोळ, काशिनाथ नडगे, दीपक गव्हाणकर, डॉ.चौधरी व सुभाष पाटील या वसईतील भाविकांनी 14 जानेवारी 1994मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर श्री वज्रेश्वरी देवी (वसई किल्ला) जीर्णोद्धार समिती स्थापून पुन्हा एकदा मंदिराच्या जीणोद्धाराचा संकल्प सोडला. अवघ्या दोन वर्षाच्या अवधीत 15 जानेवारी 1996 या दिवशी मंदिराचे काम पूर्ण झाले.आपल्या देशात मंदिराची उभारणी झाली ती प्रामुख्याने देवी नवसाला पावली म्हणून वा युद्धात विजयश्री मिळाल्याने. वसईच्या किल्ल्यातील वज्रेश्वरीचे मंदिरही पोर्तुगीजांवरील विजयातूनच निर्माण झाले आहे. सतराव्या शतकापासून तुर्क, मोगल यांच्या आक्रमणांनी प्राचीन हिंदू मंदिराचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्यात आला. काही मंदिरे कालौघात भंगली, जीर्ण झाली.किल्ल्यातील वज्रेश्वरीचे देवालयही असेच भग्न झाले होते.नरवीर चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला सर केल्यानंतर धर्मांतरासाठी पोर्तुगीजांनी किल्ल्यात डांबून ठेवलेल्या हजारो हिंदूंना मुक्त केले. किल्ल्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिराबरोबर त्यांनी वसई तालुक्यात शंकर मंदिरे व तलाव यांची जागोजागी निर्मिती केली. पुजारी नेमले. त्यांच्या चरितार्थासाठी व मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जमिनी इनाम दिल्या. कोकणातून बर्वे, कर्पे, फडनीस, साठे, परांजपे या पेशव्यांच्या वंशजांची घराणी वसई परिसरात आणून वसविली.
वसई किल्ला, किल्ल्यातील वज्रेश्वरी देवी व वसईतील तत्कालीन समाजाला पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीतून मुक्त करणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांचा अश्वारुढ पुतळा पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या प्रयत्नाने किल्ल्याच्या प्रांगणात मोठ्या दिमाखाने उभा आहे. चिमाजी आप्पांच्या वसईवरील ऋणातून उतराई होण्याचे जणू हे प्रतीकच आहे.